Thursday, August 7, 2008


जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी

जीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो? कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का? आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का? हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.

ह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे. आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.

आता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्‍या लॉगिन विभागाकडे या.

तुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.

जेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http शी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ता http ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.

आता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे? जर http असेल तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.

तुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का? असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही, तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.

जीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. ण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.

आता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.

ही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.


-----

Sunday, August 3, 2008

झकास युटीलिटीः Unlocker


आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः


Cannot delete file: Access is denied


There has been a sharing violation.


The source or destination file may be in use.


The file is in use by another program or user.


Make sure the disk is not full or write-protected and that the file is not currently in use.


ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.


ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १..७ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजे Freeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः


http://ccollomb.free.fr/unlocker/unlocker1.8.7.exe


किंवा

http://ccollomb.free.fr/unlocker/#download


(डाऊनलोड पानावर ही लिंक अतिशय बारीक अक्षरांमध्ये दिलेली आहे.
खूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.
)


आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही

अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.




अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते. राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे.


वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.
-----

Tuesday, July 29, 2008

न फुटणारं भिंग


बारीक टाईप वाचणं हा काही वेळा कामाचा तर काही वेळा नेहमीच्या वाचनाचा भाग असतो. बरेच ज्येष्ठ नागरिक अशा वेळी बहिर्गोल भिंग घेऊन वाचन करताना दिसतात. संगणकाच्या स्क्रीनवरचं बारीक अक्षरही असं बहिर्गोल भिंग घेऊन वाचणं शक्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'होय शक्य आहे. त्यासाठी एक डिजिटल बहिर्गोल भिंग तुम्हाला मिळू शकतं.


वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे हे भिंग तुमच्या स्क्रीनवर अशा स्टाईलमध्ये येतं. डिजिटल असल्याने ते अर्थातच हाताने फिरवावं लागत नाही. माऊसच्या क्लीकमध्ये धरून ते हवं तिथे सरकवता येतं. बारीक टाईप वाचण्यासाठी बरीच मंडळी त्याचा उपयोग सध्या करीत आहेत. तुम्हालाही प्रयत्न करून पहायला हरकत नाही. हे भिंग म्हणजे एक मोफत प्रोग्राम किंवा फ्रीवेअर आहे. http://www.4neurons.com/other/Magnifying_Glass/ ह्या साईटवरून तुम्ही हे भिंग डाऊनलोड करून घेऊ शकता. हे भिंग वापरणं हा सवयीचा भाग आहे. सुरूवातीस ते वापरणं किचकट वाटू शकतं. नंतर मग ते वापरण्याचीच सवय होऊन बसणही अशक्य नाही.

हे भिंग मोफत मिळतं. ते फुटत नाही. हरवत नाही. कोणी ते आपल्याकडे मागू शकत नाही. एक गंमत म्हणून ते (म्हणजे माऊस) लहान मुलांच्या हातात द्यायलाही हरकत नाही. उपयुक्तता आणि मनोरंजन एकाच वेळी साधणारं हे भिंग आहे.

------

Friday, July 25, 2008

गजराचं घड्याळ
ऑनलाईन आणि ऑफलाईन



http://www.kukuklok.com/ ही म्हंटलं तर एक वेबसाईट आहे, पण खर्‍या अर्थाने ती फक्त एक गजराचं घड्याळ आहे. हे गजराचं घड्याळ तुमची इंटरनेट लाईन चालू असताना आणि मुख्य म्हणजे चालू नसतानाही चालतं. रात्री झोपताना तुम्ही गजर लावलात आणि मध्यरात्री कधीतरी इंटरनेट कनेक्शन बंद झालं तरी kukuklok चा गजर वेळच्या वेळी होतो.

हे गजराचं घड्याळ वापरायला सोपं आहे. आपल्याला हवा तो वेळ सेट करायचा आणि नंतर SET ALARM वर क्लीक करायचं. हे डिजिटल घड्याळ असल्याने कोणत्याही मिनिटापर्यंत आपल्याला गजर लावता येतो. गजराचे एकूण चार आवाज कूकूक्लॉक ने दिले आहेत. पहिला आहे कोंबड्याची भली मोठी बांग. दुसरा घड्याळाचा नेहमीचा कीर्रर्रर्र करून वाजणारा आवाज, तिसरा इलेक्ट्रॉनिक गजराचा आवाज आणि चौथा गिटार ह्या वाद्याचा आवाज. आपल्याला हवा तो आवाज निवडून आपण गजर लावू शकतो. ह्या घड्याळाला साईटवाल्यांनी Swiss Made असं म्हंटलं आहे. ते का, हे समजायला त्यांनी मार्ग ठेवलेला नाही. पण त्याने काही बिघडत नाही कारण अपनेको आम खाने से मतलब आहे. गजर बरोबर होणं महत्वाचं.

खास टीपः ही साईट केवळ एका पानाची आहे. हे पान तुमच्या ब्राऊझरच्या File मेनूमध्ये जाऊन आणि नंतर Save as.. वर क्लीक करून html (Complete) फाईल म्हणून सेव्ह करा. हे पान सेव्ह करताना त्याबरोबर Online Alarm Clock_files नावाचं एक फोल्डर आपोआप सेव्ह होतं. त्या फोल्डरमध्ये जा. तिथे klok नावाची फ्लॅश फाईल मिळेल. ही फाईल फक्त ७८ के.बी. इतकी छोटी आहे. ही फाईल म्हणजेच ते अलार्म क्लॉक आहे. त्या फाईलवर डबलक्लीक केलं की ते गजराचं घड्याळ उघडतं. इंटरनेट असो वा नसो. गजर लावता येतो, झालेला गजर थांबवता येतो. हवी ती वेळ आणि हवा तो आवाज अर्थातच निवडता येतो. फक्त ७८ के.बी. च्या एका फाईलमध्ये एवढं सगळं साठू शकलं याचं श्रेय आजच्या प्रगत फ्लॅश टेक्नॉलॉजीला. त्या फोल्डरमधल्या इतर (जावास्क्रीप्ट वगैरे) फाईल्सचा त्या घड्याळाला तसा काहीच उपयोग नाही. हव्या तर त्या डिलीट करून टाका. हे गजराचं घड्याळ कोणालाही ईमेलने पाठवता येणं शक्य आहे. प्रत्यक्ष प्रयोग करून पहा.

------

Wednesday, July 23, 2008

Googleplex चा योगायोग



) Google हा शब्द इंग्रजी Googol ह्या शब्दावरून घेतला आहे.


) Googol म्हणजे १ ह्या आकड्यावर शंभर शुन्ये ठेवली असता येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by 100 zeros (ten raised to the power of a hundred). माहितीचा प्रचंड स्त्रोत सांगण्यासाठीच मूळ Googol वरून Google असे नामकरण गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी केले.


) Google कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आवाराचे नाव ठेवताना Google आणि Complex ह्या दोन इंग्रजी शब्दांचा संयोग करून ते Googleplex असे ठेवण्यांत आले.


) Googolplex (स्पेलींग नीट पहा) हाही एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे १ ह्या आकड्यावर एक Googol शुन्य ठेवल्यानंतर येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by a googol of zeros (ten raised to the power of a googol)


) Googleplex (अगदी तेच स्पेलिंग) शब्द पहिल्यांदा वापरात आला तो १९७७ साली. तेव्हा गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे बोबडं बोलण्याच्या वयातले म्हणजे फक्त तीन साडेतीन वर्षांचे होते. Googleplex हे नाव बीबीसी रेडिओवर प्रसारित झालेल्या एका जगप्रसिद्ध मालिकेत १९७७ साली आलं. ती जगप्रसिद्ध रेडिओ मालिका म्हणजे डग्लस अडॅम्स लिखित The Hitchhiker's Guide to the Galaxy.


) The Hitchhiker's Guide to the Galaxy मध्ये जो अत्यंत शक्तीमान असा काँप्युटर दाखवला गेला आहे त्या काँप्युटरच्या भल्या मोठ्या नावाची अद्याक्षरे GOOGLEPLEX अशीच होती (होय अगदी तेच स्पेलींग).


) Hitchhiker's Guide मधला शक्तीमान संगणक GOOGLEPLEX आणि आजचे सर्वांत शक्तीमान सर्च इंजिन गुगलचे मुख्यालय आवार म्हणजेही GOOGLEPLEX. दोन्हींचा संबंध शक्तीमान संगणकांशी आणि दोन्हींचे स्पेलींगही तंतोतंत सारखे असावे हा एक मोठाच योगायोग.


) आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे google हा शब्द आता अधिकृतपणे क्रियापद म्हणून इंग्रजी शब्दकोशांनी स्वीकारला आहे. Googol आणि Googolplex हे दोन्ही इंग्रजी शब्दकोशातले शब्द

आहेत. आता Googleplex हे गुगलच्या मुख्य कार्यालय आवाराचे नावही इंग्रजी शब्दकोशात जाणार का? ह्या विषयी काही माहिती सापडत नाही.


ता.क. ९) अगदी ताजा योगायोग - गुगलचे एक संस्थापक मालक सर्जी ब्रिन हे २०१० साली पर्यटनासाठी अंतराळात जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतेच (११ जून २००८ रोजी) सुमारे २२ कोटी (५ दशलक्ष डॉलर्स ) रूपये भरून अंतराळयान बुक केले आहे. सविस्तर व अधिकृत बातमीसाठी इथे क्लीक करा. सर्जी ब्रिनना गॅलक्सीत (अंतराळात) जावसं वाटलं याचं कारणही Googleplex आणि Hitchhikers Galaxy ह्या योगायोगात लपलं असेल का? त्याचीही माहिती कुठे सापडत नाही.


वेल, गुगलमध्ये शोधून पहायला हवी ००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००



--------